तू फक्त माणूसपण सोडू नकोस…

तू फक्त माणूसपण सोडू नकोस…
गंज लागलेल्या बुद्धीच्या भावड्या…
महामानवांच्या विचारांचं हनन होत नाही रे
शाई दगड विटांच्या माऱ्याने…
हात तर काळे झाले असतीलच तुझे
तोंड ही काळं करून घेतलंस बघ!
अविचारी जातिद्वेषाच्या तोऱ्याने…
दोन बुक वाचले असतेस तर
हातातली शाई
कागदावर उतरवली असती…
त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करत
सत्यशोधक चळवळ
गावभर पसरवली असती…
आईच्या लुगड्यात शेणाने माखलेली
साऊ दिसली असती…
बापाच्या कुपोषित बरगड्यात
गुलामगिरी फसली नसती…
पेटला असतास जोतिबांच्या क्रांतिकारी विचारांचं आसूड घेऊन!
या विषमतावादी व्यवस्थेवर प्रहार करण्यासाठी…
निराधारांचा हात धरण्यासाठी…
हौद खुली करून समतेच
पाणी भरण्यासाठी…
भिडेवाड्याच्या विटा रचण्यासाठी…
आणि आत्मीयतेने फुले शाहू आंबेडकर वाचण्यासाठी…
बघ अजून ही वेळ गेलेली नाही
क्रांतीज्योती नावाचं आभाळ त्यांच्या छायेखाली तुला नक्कीच सामावून घेतील…
तू फक्त माणूसपण सोडू नकोस…
तू फक्त माणूसपण सोडू नकोस…
सुमेध वंदना मधुकर सोनावणे
9967162063

