राजकारण

TET पेपरफुटी आंदोलनाला मोठं यश! शिक्षणमंत्री दादा भुसेंनी 7 प्रमुख मागण्या मान्य; MCOCA कारवाईची घोषणाही

TET पेपरफुटी प्रकरणी सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या लढ्याला मोठं यश मिळालं आहे. शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी आंदोलकांच्या 12 पैकी 7 प्रमुख मागण्या मान्य करत पेपरफुटीतील दोषींवर मकोका (MCOCA) अंतर्गत कारवाईसह अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत.

सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या लढ्याला यश

TET पेपरफुटी प्रकरणी वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलनाने शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव येथील निवासस्थानी आंदोलन केले होते. त्यानंतर झालेल्या बैठकीत आंदोलकांनी 12 मागण्यांचे निवेदन दिले आणि 8 दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. मुदत संपल्यानंतर पुन्हा आंदोलनाची भूमिका घेण्यात आली. त्याआधीच शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विद्यार्थ्यांची भेट घेत 12 पैकी 7 मागण्या मान्य केल्याची घोषणा केली.

पेपरफुटीतील दोषींवर MCOCA

शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी स्पष्ट केले की, TET पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर मकोका (MCOCA) अंतर्गत कारवाई केली जाईल. या घोटाळ्यात सहभागी असलेल्या कोणालाही सोडले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

TET उमेदवारांना मोठा दिलासा

भुसे यांनी जाहीर केले की, पेपरफुटीनंतर नोंदणी केलेल्या उमेदवारांकडून पुढील TET परीक्षेसाठी कोणतेही परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही. तसेच रद्द झालेल्या TET परीक्षांमुळे प्रभावित उमेदवारांना वयोमर्यादेशिवाय कितीही वेळा परीक्षा देता येईल.

शिक्षक पदोन्नती आणि ऑनलाइन परीक्षेवर निर्णय

शिक्षकांच्या पदोन्नतीसाठी TET अनिवार्य करण्याच्या नियमाचा पुनर्विचार करण्यासाठी इतर राज्यांच्या धोरणांचा अभ्यास केला जाईल, असे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले. तसेच भविष्यात पेपरफुटी रोखण्यासाठी ऑनलाइन TET परीक्षा घेण्याबाबत IBPS संस्थेशी चर्चा सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.

शिष्यवृत्ती आणि शिक्षक भरतीबाबत आश्वासन

आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती वेळेत मिळाव्यात यासाठी संबंधित विभागांशी समन्वय साधला जाईल. याशिवाय जून 2025 मधील TET पात्र उमेदवारांची पवित्र पोर्टलद्वारे पुढील दोन ते तीन महिन्यांत शिक्षक भरती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही भुसे यांनी सांगितले.

उर्वरित मागण्यांवरही लवकर बैठक

उर्वरित मागण्यांबाबत शिक्षणमंत्र्यांनी लेखी उत्तर दिले असून, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, शिक्षण विभागाचे अधिकारी आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या प्रतिनिधींसोबत मंत्रालयात लवकरच बैठक घेण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button