संत शिरोमणी सावता महाराज चॅरिटेबल ट्रस्ट जाहीर खुलासा

सकाळ
रजि. नं. ६८७४८ / P
संत शिरोमणी सावता महाराज चॅरिटेबल ट्रस्ट
जाहीर खुलासा
तमाम लोकांना, विशेषतः मौजे अरण, ता. माढा, जि. सोलापूर तसेच महाराष्ट्रातील सर्व भाविकांना या जाहीर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, श्री संत सावतेबुवा महाराज देवस्थान ट्रस्ट, अरण, ता. माढा, जि. सोलापूर यांनी दि. १८/०१/२०२६ रोजी दै. पुण्यनगरी या वृत्तपत्रामध्ये जाहीर निवेदन प्रसिद्ध केले होते. त्यास आमचे अशील संत शिरोमणी सावता महाराज चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे तर्फे अध्यक्ष श्री अमोल उर्फ सावता अंकुश वसेकर व सचिव श्री प्रभू मोहन घाडगे (उर्फ माळी) यांच्या वतीने खालीलप्रमाणे सविस्तर उत्तर देण्यात येत आहे.
सदर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री विठ्ठल भानुदास गाजरे (पाटील) व सचिव श्री विजय विठ्ठल शिंदे (पाटील) यांनी दि. १८/०१/२०२६ रोजी दै. पुण्यनगरी या वृत्तपत्रात जाहीर निवेदन प्रसिद्ध करून आमच्या अशिलाची नाहक बदनामी केलेली आहे. त्या निवेदनातील सर्व आरोप खोटे, निराधार व द्वेषपूर्ण स्वरूपाचे असून त्यास कोणताही ठोस पुरावा नाही. सदर आरोप आमच्या अशिलांच्या हिताविरुद्ध जाणीवपूर्वक करण्यात आलेले आहेत.
आमच्या अशिलांनी स्थापन केलेली संत शिरोमणी सावता महाराज चॅरिटेबल ट्रस्ट ही कायद्यानुसार विधिपूर्वक नोंदणीकृत संस्था आहे. सदर ट्रस्टची नोंदणी सर्व कायदेशीर तरतुदींनुसार करण्यात आलेली असून आमचे अशील हे त्या संस्थेचे कायदेशीर अध्यक्ष व सचिव आहेत. त्यांची नियुक्ती सर्व नियमांचे पालन करून करण्यात आलेली आहे. त्यामुळे आमच्या अशिलांनी कोणतीही बनावट संस्था स्थापन केलेली नाही किंवा कोणाचीही फसवणूक केलेली नाही.
जाहीर निवेदनात नमूद केल्याप्रमाणे श्री अमोल अंकुश वसेकर व प्रभू मोहन घाडगे हे स्वतःची नावे अनुक्रमे “सावता महाराज वसेकर” व “प्रभू महाराज माळी” अशी भासवतात व अरणचा पत्ता खोट्या लेटरहेडवर वापरतात, असा आरोप करण्यात आलेला आहे. हा आरोप पूर्णपणे चुकीचा व दिशाभूल करणारा आहे. वास्तवात, अध्यक्ष श्री अमोल अंकुश वसेकर (उर्फ सावता महाराज वसेकर), रा. अरण, ता. माढा, जि. सोलापूर व सचिव प्रभू मोहन घाडगे (उर्फ प्रभू महाराज माळी) यांची ओळख सावता महाराज भक्त परिवारास विदित आहे.
देवस्थान ट्रस्टच्या निष्क्रिय कारभारामुळे व भक्त परिवाराच्या सूचनेनुसार संत सावता महाराज यांचे १९ वे वंशज अमोल उर्फ सावता महाराज वसेकर यांनी सदर चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केलेली आहे. भाविकांनी दिलेल्या देणग्यांचा योग्य व पारदर्शक वापर करण्यात आलेला असून खालीलप्रमाणे कामे करण्यात आलेली आहेत :
१. तीर्थक्षेत्र अरण येथे १ हेक्टर १२ आर जमीन खरेदी करण्यात आलेली आहे.
२. शासनस्तरावर पाठपुरावा करून अरण येथे ‘अ’ दर्जा तीर्थक्षेत्र म्हणून मान्यता मिळविण्यात आलेली आहे.
३. महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, मा. छगनराव भुजबळ, मा. जयकुमार गोरे व मा. अतुलजी सावे यांच्या प्रयत्नातून अरण तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजूर करून घेण्यात आलेला आहे.
४. शासनामार्फत सदर विकासकामासाठी रु. १५२ कोटींची मंजुरी प्राप्त झालेली आहे.
५. पंढरपूर येथून संजीवन समाधी काळात येणाऱ्या पांडुरंगाच्या पालखीत मुख्य पादुका विराजमान असाव्यात व व्यवस्थापन विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीमार्फत व्हावे, याबाबत मागणी करून कार्यवाही करण्यात आलेली आहे.
६. अरण येथे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा बस थांबा सुरू करण्यासाठी प्रयत्न करून कार्यवाही करण्यात आलेली आहे.
जमीन अधिग्रहणानंतर त्या ठिकाणी सावता महाराज भक्तीमळा, भक्तनिवास, पालखी तळ, सभागृह व वास्तुशिल्प उभारण्याचा मानस आहे. महाराष्ट्रातील भाविकांच्या मागणीनुसार संत सावता महाराज यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी “उत्सव पादुका दर्शन सोहळा” आयोजित करण्याचा मानस आहे.
संत सावता महाराज हे वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ संत असून त्यांनी अभंगात म्हटले आहे :
।। पूर्वापार कुळी पंढरीचा नेम ।।
पंढरीच्या वारीची परंपरा पुढे चालविण्याच्या उद्देशाने त्यांच्या पादुकांचा उत्सव महाराष्ट्रभर आयोजित करण्याचा मानस आहे. या उपक्रमास कोणतीही कायदेशीर अडचण नाही. चांदीच्या उत्सव पादुकांसाठी भाविकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून लवकरच त्या दर्शनासाठी उपलब्ध होतील.
म्हणून श्री संत सावतेबुवा महाराज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विठ्ठल भानुदास गाजरे (पाटील) व सचिव विजय विठ्ठल शिंदे (पाटील) यांनी पसरविलेल्या अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये. सदर व्यक्तींनी त्यांच्या कार्यकाळात मंदिर व भाविकांच्या सोयीसाठी कोणतेही ठोस विकासकाम केलेले नाही. आकसापोटी व द्वेषभावनेतून आमच्या ट्रस्टवर बिनबुडाचे आरोप करण्यात आलेले आहेत.
सदर बेकायदेशीर निवेदनामुळे आमच्या अशिलाची समाजात बदनामी झाली असून त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का बसलेला आहे. त्यांच्या वैयक्तिक व व्यावसायिक आयुष्यावर विपरीत परिणाम झालेला आहे.
हे उत्तर प्राप्त झाल्यापासून ७ दिवसांच्या आत वरीलप्रमाणे कार्यवाही न केल्यास आमचे अशील आपल्याविरुद्ध फौजदारी तसेच दिवाणी कारवाई (मानहानी व नुकसानभरपाई दावा) करण्यास बाध्य राहतील. त्यास होणाऱ्या सर्व खर्च व परिणामांस आपणच जबाबदार राहाल.
—
दि. २४/०२/२०२६
अशिल
संत शिरोमणी सावता महाराज चॅरिटेबल ट्रस्ट
अध्यक्ष : अमोल उर्फ सावता अंकुश वसेकर
सचिव : प्रभू मोहन माळी (घाडगे)
अॅड. एस. जी. उपाध्ये
अशिलस्तकें
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
यासोबतच हेही निदर्शनास आणून देण्यात येते की, संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी तीर्थक्षेत्र, अरण या तीर्थक्षेत्राला ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देऊन आज १८ महिने उलटून गेले तरी शासनाने यावर कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही किंवा कोणतेही काम प्रत्यक्ष सुरू झालेले दिसून येत नाही. संत शिरोमणी सावता महाराजांचे वंशज पुजारी यांच्या तीन-चार ट्रस्ट कार्यरत आहेत. तसेच सन १९५२ सालचा जो जुना ट्रस्ट आहे, तो गावातील विविध मंदिरांचे व्यवस्थापन करण्याच्या उद्देशाने सरकारने कायदा व हुकूम केल्यानंतर त्या वेळच्या सरपंचांनी “सावते बुवा देवस्थान ट्रस्ट” या नावाने स्थापन केलेला आहे. वास्तविक या ट्रस्टचे नाव “संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी मंदिर ट्रस्ट” असे असणे आवश्यक होते किंवा त्यास अनुसरून असणे अपेक्षित होते; परंतु तसे करण्यात आले नाही. संत सावता महाराज यांना “सावता बुवा” या एकेरी शब्दाने संबोधले जाते, ही बाब बदलण्याची मागणी वारंवार करूनही अद्याप दुरुस्ती करण्यात आलेली नाही, ही खेदजनक बाब आहे.
सदर प्रकरणात अरण गावातील ट्रस्ट एक बाजूला असून दुसऱ्या बाजूला सावता महाराजांच्या मुलीच्या वंशजांचे तीन-चार ट्रस्ट कार्यरत आहेत. या सर्वांमध्ये मागील सुमारे ३०–३५ वर्षांपासून वाद सुरू असून त्या वादामुळे अरण गावाचा तसेच संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी तीर्थक्षेत्राचा अपेक्षित विकास होताना दिसत नाही. त्यामुळे शासनाने यावर कायमस्वरूपी तोडगा काढणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी दोन्ही पक्षांच्या ताब्यात मंदिर न ठेवता, निष्पक्ष व निपक्षपाती भूमिकेतून मंदिर ट्रस्ट अधिग्रहण कायदा वापरून मंदिराचे अधिग्रहण करावे व शासकीय समिती नेमून मंदिर, परिसर व तीर्थक्षेत्र विकासाचा कारभार त्या समितीमार्फत चालवावा.
सध्या सावता महाराजांचे भक्तगण, वारकरी संप्रदाय, गावकरी, वंशज तसेच संत परंपरेतील समाज यांच्यामध्ये अंतर वाढत चालले आहे. मागील सुमारे ७३० वर्षांपासून असलेली संत सावता महाराजांची संजीवन समाधी अपेक्षित विकासापासून वंचित राहिलेली आहे. ही परिस्थिती तातडीने सुधारण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून संत शिरोमणी सावता महाराजांविषयी आस्था असलेल्या प्रतिनिधींची शासकीय समितीवर नियुक्ती करावी व प्रलंबित वाद त्वरित मिटवून अरण तीर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकास करावा. तसेच मंजूर झालेले रु. १५२ कोटी निधी खर्च करून विकासकामे गतीने पूर्ण करण्यात यावीत, अशी सावता महाराज भक्तांची नम्र विनंती आहे. महाराष्ट्र तसेच देशभरातूनही अशीच मागणी होत आहे.
वरीलप्रमाणे ठाम मत संत सावतामाळी ट्रस्टचे अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी व्यक्त केले आहे.




