लिंग छेदन अहा सांगता वाचा रडे । आठविता मन खिरडे ।। कटारे मूर्खी केवढे । जोडिले निरय ।।

लिंग छेदन
अहा सांगता वाचा रडे । आठविता मन खिरडे ।। कटारे मूर्खी केवढे । जोडिले निरय ।।
अर्थ : अरेरे! त्या असुरांची कथा सांगताना वाचा रडकुंडीला येते. त्यांच्या कथेची आठवण झाली की, मन मागे हटते. हाय, हाय ! त्या मूर्खानी केवढा नरक प्राप्त करून घेतला आहे बरे !
भगवानबाबांच्या उपक्रमशिलतेमुळे हजारो लोक बाबांचे भक्त झाले. वारंवार गडावर वारीसाठी येऊ लागले. देव, गुरू, साधु-संतांचे दर्शन रिक्त हस्ते करू नये, या सिद्धांताचे पालन करू लागले. धन-धान्य, गायी, दान करू लागले. गडावर शे-दोनशे गार्गीचा पांजरपोळ झाला. धान्याने कोठार भरले. धनाचा वास सज्जनांपेक्षा दुर्जनांना जास्त लवकर लागत असतो. सज्जन पापाला भितो; पण दुर्जनांना ही भीती नसते.
आजूबाजूला चोर, दरोडेखोर लुटालूट करत होते. तसेच मुसलमानी सरदार, शिपाई गावोगाव जाऊन विनाकरण जुलूम जबरदस्ती करून धनधान्याची लुटालूट करत असत. त्यांचा बंदोबस्त करता यावा, भाविकांनी गडाच्या सुधारणेसाठी दान केलेल्या वस्तुचा सांभाळ करता यावा यासाठी कामगारांची नेमणूक केली. राखणदार, गुराखी, पहारेकरी, टाळकरी, माळकरी, आणि येणाऱ्या- जाणाऱ्यांची व्यवस्था करण्यासाठी कामे नेमून दिली होती.
भगवानबाबांना व्यायामाची आणि कुस्ती वगैरे खेळाची आवड होती. मुख्य दरवाजाच्या समोर छान तालीम बांधून घेतली. तरुण मुले त्या ठिकाणी कसरत करत असत. कुस्ती शिकविण्यासाठी उस्ताद म्हणून राजुरीच्या विश्वनाथ गवळी यास ठेवले होते. तो सर्वांना व्यायाम आणि कुस्तीचे धडे देत असे.
पहाटे पहाटे पखाल डोहावर किंवा गडवाडीच्या विहिरीवर अंघोळी करून व्यायाम, जोर, दंड, बैठका करायच्या, गाईचे दूध प्यायचे. भरलेले पोते उघडून खोबऱ्याचे गोळे पोटभर खायचे. दिवसभर तालमीत कुदायचे, कुस्त्या खेळायचे. लोळायचे. गडावरील धनाच्या संरक्षणासाठी बाबांनी अशी व्यवस्था केली होती. भगवानबाबांनी गावोगाव जाऊन भिक्षा गोळा करून गडावर आणावी.
१८०
।


