राजकारण

विधान परिषद निवडणुकीत मविआ बॅकफूटवर! चार जागांवर उमेदवारच नाहीत; महायुतीचा विजय जवळपास निश्चित

राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसल्याचे चित्र दिसत आहे. 17 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत तब्बल चार मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवारच मैदानात नसल्याने त्या जागांवर महायुतीच्या उमेदवारांचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच महायुतीचे पारडे जड झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतर अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र सध्याच्या स्थितीत काही महत्त्वाच्या जागांवर विरोधी उमेदवार नसल्याने महायुतीला मोठा फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नाशिक मतदारसंघात महाविकास आघाडीच्या वाट्याला आलेल्या जागेसाठी नावांची चर्चा झाली होती. मात्र प्रत्यक्षात उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने तेथील समीकरण बदलले. त्याचप्रमाणे अहिल्यानगरमध्येही उमेदवारीबाबत चर्चा झाली असली तरी अखेर अर्ज भरला गेला नाही. परिणामी या दोन्ही ठिकाणी निवडणुकीचा रंग फिका पडला आहे.

सोलापूरमध्ये काँग्रेसचे उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र छाननीदरम्यान स्वाक्षरीसंदर्भातील आक्षेपामुळे त्यांचा अर्ज बाद झाला. त्यामुळे सोलापूरमध्येही महाविकास आघाडीसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.

यवतमाळमध्ये काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र मतांची आवश्यक जुळवाजुळव न झाल्याने त्यांनी उमेदवारी मागे घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या मतदारसंघातही महाविकास आघाडीची लढत राहिलेली नाही.

या चारही मतदारसंघांतील घडामोडींमुळे महायुतीच्या उमेदवारांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. आधीच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संख्याबळ महायुतीच्या बाजूने असल्याने निवडणुकीत त्यांना स्पष्ट आघाडी मिळण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून होणाऱ्या या निवडणुकीत नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि इतर स्थानिक लोकप्रतिनिधी मतदान करतात. अलीकडील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीला मिळालेल्या यशाचा परिणाम विधान परिषद निवडणुकीतही दिसू शकतो, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

महाविकास आघाडीच्या काही जागांवरील उमेदवारीतील गोंधळ, अर्ज बाद होणे आणि काही ठिकाणी माघारीमुळे निवडणुकीपूर्वीच त्यांची रणनीती विस्कळीत झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे अंतिम निकालापूर्वीच महायुतीला मानसिक आघाडी मिळाल्याचे बोलले जात आहे.

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button