पाडव्याच्या दिवशी समता भूमीच्या दारामध्ये जट निर्मूलन
वामन अन

पाडव्याच्या दिवशी समता भूमीच्या दारामध्ये जट निर्मूलनवामन अन
बळीराजाच्या कथेबद्दल महात्मा जोतिबा फुले यांच्या “गुलामगिरी” पुस्तकातील निवडक संवाद वाचा ! जोतिबा Formal Logic चा खुबीने कसा वापर करत हे समजून येईल.
धोंडीबा –– तर मग आदिनारायणानें बळीस पाताळीं घालण्याकरितां वामनाचा अवतार घेतला. त्या वामनानें भिकाऱ्याचें सोंग घेऊन बळीराजास फसवून, त्यापासून तीन पाउलें पृथ्वी मागून घेतली. नंतर त्यानें भिकाऱ्याचें सोंग टाकून इतका मोठा अगडबंब मनुष्य बनला कीं, त्यानें एकंदर सर्व पृथ्वी आणि आकाश आपल्या दोन्ही पाउलांत आटवून बळीराजास विचारलें कीं आतां मीं तिसरें पाऊल कोठें ठेवावें ? नंतर बळीराजानें लाचार होऊन त्या अगडबंब्यास असें उत्तर दिलें कीं, तूं आतां आपलें तिसरें पाऊल माझ्या मस्तकावर ठेव. असें म्हणतांच त्या बंब्यानें बळीराजाच्या मस्तकावर आपलें तिसरें पाऊल ठेवून बळीस पाताळीं घालून आपला करार पुरा करून घेतला, असें त्याचे उपाध्यांनी भागवत वगैरे इतिहासांत लिहून ठेविलें आहे, तें सर्व तुमच्या या हकीकतीवरून खोटें आहे असें सिद्ध होतें. तर याविषयीं तुमचा काय अभिप्राय आहे तो कळूं द्या.
जोतीबा – आतां यावरून तूंच विचार करून पहा कीं, जेव्हां त्या बंब्याने आपल्या दोन पावलांत एकंदर सर्व पृथ्वी आणि आकाश आटविलें, तेव्हां त्या बंब्याच्या पहिल्या पावलाखालीं कित्येक गावें चेंगरून लयास गेलीं असतींल, नाहीं बरें ? दुसरें असें कीं, त्या बंब्यानें जेव्हां आपलें दुसरें पाऊल आकाशांत ठेवितेवेळीं तेथें अतिशय दाटी झाल्यामुळे कित्येक ताऱ्यांच्या एकमेकांवर आदळून चुराडा झाला असेल कीं नाहीं बरें ! तिसरें असें कीं, त्या बंब्यानें आपल्या दुसऱ्या पावलांत जर सर्व आकाश आटविलें तर त्याचें कंबरेपासून वरचें धड कोठें राहिलें असावें ? कारण मनुष्याचें दुसरें पाऊल फार झालें तर त्याच्या बेंबटापर्यंत ऊंच आकाशांत पोहचूं शकतें. यावरून त्या बंबाचे कंबरेपासून त्याच्या मस्तकापर्यंत आकाश उरलें असेल, त्यांत अथवा त्या बंब्यानें आपल्याच माथ्यावर आपलें तिसरें पाऊल ठेवून आपला करार पुरा करून घेण्याचें एकिकडेस ठेवून त्यानें केवळ दगेबाजी करून आपलें तिसरे पाऊल बळीराजाच्या मस्तकावर ठेवून त्याला पाताळीं घातलें, हें कसें ?
धों॰ –– काय तो बंब्या आदिनारायणाचा अवतार ना ? आणि त्याच्यानें अशी ढळढळीत दगलबाजी कशी करवली ? अशा लबाडास आदिनारायणाचा अवतार म्हणणाऱ्या इतिहासकर्त्यांस धिक्कार असो. कारण त्यांच्याच लेखावरून वामन हा कपटी, घातकी आणि कृतघ्न होता; असें सिद्ध होतें, कीं ज्याने आपल्या दात्यास कपटानें पाताळीं घातलें.
जो॰ –– चवथें असें कीं, त्या बंब्याचें डोकें जेव्हां आकाशापलीकडेस स्वर्गांत ऊंच गेलें असेल, तेव्हां त्यास तेथून बळीस फारच मोठ्यानें ओरडून विचारावे लागलें असेल कीं, आतां माझ्या दोन पावलांतच एकंदर सर्व पृथ्वी आणि आकाश आटलें, यास्तव आतां मीं माझें तिसरें पाऊल कोठें ठेवून आपली कबुलायत पुरी करून घ्यावी ? कारण आकाशांतील त्या बंब्याचें मुख आणि पृथ्वीवरील बळीराजा यांमध्यें अनंत कोसांचे अंतर पडलें असेल; आणि त्यापैकीं रशियन, फ्रेंच, इंग्लिश आणि अमेरिकन वगैरे लोकांपैकीं एकाहि मनुष्यास त्या भाषणापैकीं एक शब्दसुद्धां ऐकूं गेला नाहीं, हें कसें ? व त्याचप्रमाणें पृथ्वीवरील मानव बळीराजानें त्या बंब्यास उत्तर दिलें कीं, तूं आपलें तिसरें पाऊल माझ्या मस्तकावर ठेव हें तरी त्या बंब्यास कसें ऐकूं गेलें असेल ? कारण, बळी कांहीं त्यासारिखा विचित्र प्राणी बनला नव्हता, पाचवें असें कीं, त्या बंब्याच्या भारानें ही पृथ्वी रसातळास गेली नाहीं, हें मोठें आश्चर्य होय.
धों॰ –– नाहीं तर आपण हे दिवस कोठून पाहिले असते बरे ? त्या बंब्याने काय काय खाऊन आपला जीव वांचविला असेल ? अहो, तो बंब्या गेला असेल तेव्हां त्याच्या त्या अगडबंब मढ्यास स्मशानांत नेण्याकरितां चौघे खांदेकरी तरी कोठून मिळाले असतील ? कदाचित् त्यास जागच्या जागींच लाकडें रचून जाळले असेल म्हणावे, तर त्यास जाळण्यापुरती लाकडें किंवा गोवऱ्या तरी कोठून मिळाल्या असतील ? बरें तसल्या मढ्यास जाळण्यापुरतीं लांकडें मिळालीं नसतील म्हणावें तर त्याचा जागचे जागींच कोल्ह्याकुत्र्यांनी खाऊन भंडारा केला असेल काय ? सारांश, भागवत वगैरे सर्व ग्रंथांवरून जर सदरीं लिहिलेल्या शंकांचें निवारण होत नाहीं, तर उपाध्यांनीं मागाहून संधीं पाहून एकंदर सर्व मूळच्या दंतकथांवरून हे सर्व ग्रंथ केले असावेत असे सिद्ध होतें.
जो॰ –– बाबा ! तूं तें भागवत एक वेळ वाचून पहा, म्हणजे तुला त्यापेक्षां इसापनीति बरी वाटूं लागेल.
आज बलिप्रतिपदा.. बहुजनांचा सर्वात मोठा सण.. या सणाच्या दिवशी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे नंदिनी जाधव यांनी ३१०व्या महिलेचे जटनिर्मूलन केले. दरवर्षी बलिप्रतिपदेच्या दिवशी महात्मा फुले वाडा अर्थात समताभूमीपासून लाल महालापर्यंत बळीराजाची मिरवणूक निघते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अनेक कार्यकर्ते या मिरवणुकीत सहभागी होत असतात. मिरवणूक पुढे निघाली असतानाच नंदिनी जाधव यांना एक बाई दिसली, तिच्या डोक्याला कापड गुंडाळलं होतं. ताईंच्या सराईत डोळ्यांनी ओळखलं की या बाईला जट आहे. त्या बाईंना थांबवून नंदिनीताईंनी त्यांचे विचारपूस सुरू केली. तेव्हा समजलं की पंधरा वर्षापासून डोक्यामध्ये ही जट आहे आणि ही जट काढण्यासाठी त्यांची गुरू एक लाख रुपये मागत होती. दोन वेळात या गुरूकडे त्या जट काढण्यासाठी गेल्या, मात्र अपुरे पैसे असल्यामुळे जट काढण्यात आली नाही.
या बाई बिडी वळून देण्याचा व्यवसाय करतात, अशा व्यवसायात कमाई ती काय असणार! त्यामुळे प्रचंड त्रास होत असला तरी या साठीतल्या बाई ती जट वागवत होत्या. ताईंनी या बाईंचे समुपदेशन केलं, त्या बाई जट काढण्यासाठी सशर्त तयार झाल्या. अट ही होती की त्यांच्या मुलींनी परवानगी दिली तर त्या जट काढणार. ताईंनी लगेच त्यांच्या मुलीचा नंबर मागवून घेतला, आधी साधा कॉल आणि नंतर व्हिडिओ कॉल करून त्यांनी मुलीचे देखील समुपदेशन केलं. मुलगी तयार झाली आणि आईला म्हणाली की तू आजच जट काढून घे.
ताईंच्या डोक्यात विचार आला की आज आपण अनायसे समता भूमीमध्ये आहोत तर मग ज्योतिबा आणि सावित्रीबाई यांच्या प्रतिमेसमोरच त्या बाईच्या डोक्यातील अंधश्रद्धेचे उच्चाटन का करू नये!! मात्र तिथे असलेले सुरक्षारक्षक म्हणाले की यासाठी परवानगी लागेल. त्यांच्यावरील अधिकाऱ्यांशी फोनवरून बोलला असता त्याने देखील पूर्व परवानगीशिवाय तिथं काहीही करण्यास नकार दिला. गंमत पाहा!! वटपौर्णिमेच्या दिवशी याच समताभूमीमधील वडाला शेकडो बाया धागे गुंडाळून आम्हाला सावित्रीमाई नाही, सत्यवानाची सावित्री महत्त्वाची आहे असा संदेश देत असतात. त्यावेळी अर्थातच त्यांना कुणी अडवत नसते .. असो.
ताईंनी निर्णय घेतला की समताभुमीमध्ये नाही, तर तिच्या प्रवेशद्वाराबाहेर रस्त्यावर आपण जट काढुया. पाच मिनिटात जट काढण्यात आली. जट काढल्यावर त्या बाई, मीरा एकलदेवी यांनी ओझे हलके झाल्याचा अगदी मनापासून आनंद व्यक्त केला.. त्यांच्या चेहऱ्यावर फुललेल्या हास्यामुळे नंदिनीताईंचा पाडवा गोड झाला. जट काढताना स्थानिक कार्यकर्ते साठे यांचे सहकार्य लाभले, सोबत चळवळीतील साथी गजानन बिराजदार आणि शिल्पा शिवणकर देखील उपस्थित होत्या. दिवस सार्थकी लागला अशी भावना सर्वांची होती.


