महाराष्ट्र

फुले वाड्यातील वटपौर्णिमा कार्यक्रमावर वाद; खासदार मेधा कुलकर्णी यांच्या सहभागामुळे फुले विचारांच्या जतनाबाबत नवे प्रश्न

🔥 मेधाबाई.. फुले दाम्पत्याचा अपमान आम्ही सहन करणार नाही..!

मी परवा मेधा कुलकर्णी नावाच्या कजाग बाईच्या मुक्ताफळांविषयी लेख लिहिला, तेव्हा अनेक ब्रम्हजणांना मोठे वाईट वाटले; पण मी कसा योग्य होतो, ते सिद्ध करणारी करतूद या बाईने दुसऱ्याच दिवशी म्हणजे कालच करून दाखवली.

काल वटपौर्णिमा नावाचा सण होता, ज्यात बऱ्याच महिला अंधश्रद्धेने वडाच्या झाडाला फेऱ्या मारत असतात. अर्थात ज्यांना फेऱ्या मारायच्या त्यांनी त्या माराव्यात. आमचे त्याबद्दल काहीही म्हणणे नाही. या अंधश्रद्धेतून महिलांनी जागे व्हावे, यासाठी आमच्या परीने जागृतीचे काम आम्ही करत असतो. आता ज्यांना जागेच व्हायचे नाही, त्यांना आपण काय करणार..?

तर काल अनेक स्त्रियांनी सालाबादाप्रमाणे वडाच्या झाडाला फेऱ्या मारण्याची अंधश्रद्धा पार पाडली. तशी ती भाजपच्या राज्यसभा खासदार मेधाबाई कुलकर्णी यांनीही पार पाडली. सोबत बऱ्याच महिलांना घेऊन त्यांनी ही अंधश्रद्धा साऱ्या मिडियाला दाखवली. राज्यसभा खासदार म्हणून धर्मनिरपेक्ष संविधानाची शपथ घेणाऱ्या या बाईने अंधश्रद्धा बाळगणे व त्याचे जाहीर प्रदर्शन करणे हा संविधानद्रोह तर आहेच, पण यापेक्षा मोठा गुन्हा या बाईने जाणीवपूर्वक केला आहे आणि तो म्हणजे तिने ज्या वडाच्या झाडाला फेऱ्या मारल्या, तो वड कुठला निवडला माहित आहे काय? तो वड निवडला फुले वाड्यातला..! आणि हे जाणीवपूर्वक केलेलं दुष्कृत्य आहे.

विशेष म्हणजे यासाठी भारतीय पुरातत्व विभागाने दिलेल्या आदेशात बदल करण्यात आला. ’फुलेवाडा हे राज्य संरक्षित स्मारक असल्याने तेथे कोणतेही धार्मिक कार्यक्रम होऊ नयेत’, अशी मागणी पुरोगामी संघटनांनी केली होती. महात्मा फुले यांच्या पुरोगामी विचारांची आठवण करून देत, वटपौर्णिमा साजरी करण्यास त्यांनी मज्जाव केला होता. या मागणीची दखल घेत सुरुवातीला पुणे येथील पुरातत्व विभागाच्या सहाय्यक संचालकांनी वडाच्या झाडाची पूजा करण्यास बंदी घालणारे आदेश जारी केले होते.

मात्र २३ जून २०२६ रोजी पुरातत्व विभागाने या आदेशात बदल करून ‘वटपौर्णिमेच्या दिवशी महात्मा फुले वाड्याच्या परिसरात पूर्वापार चालत आलेल्या प्रथा आणि रुढी कायम ठेवून कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे अबाधित राहावी, यासाठी स्थानिक पोलिसांनी आवश्यक ती चोख कामगिरी आणि कायदेशीर कार्यवाही करावी’ असा आदेश काढला.

पुरातत्व विभाग म्हणते की, ‘पूर्वापार चालत आलेल्या प्रथा – परंपरा कायम ठेवण्या’साठी त्यांनी या आदेशात बदल केला आहे. या आदेशाचा हवाला देऊन माझा पुरातत्व विभागाला सवाल आहे की, ‘ज्याकाळात फुले दाम्पत्य या वाड्यात राहत होते, त्याकाळात महिला त्यांच्या वाड्यात वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाला फेऱ्या मारण्यासाठी येत होत्या याचा पुरातत्व विभागाकडे कोणता पुरावा आहे?’

पुराणमतवाद, ब्राम्हणवाद, स्त्रियांना गुलाम करणाऱ्या अमानवी प्रथा – परंपरा, ढोंगीपणा, धार्मिक – सामाजिक शोषण याविरुद्ध लढण्यासाठी ज्या फुले दांपत्याने आपले सारे आयुष्य समर्पित केले, ते फुले दाम्पत्य त्यांच्या वाड्यात अशी अवैज्ञानिक, दांभिक आणि स्त्रियांच्या गुलामीचे प्रतीक असलेली प्रथा राबवायला होकार देतील काय? त्याहीपेक्षा क्रांतिबा फुलेंचा दराराच इतका मोठा होता, की त्या दाराऱ्याने अशा महिलांची त्या वाड्यात येऊन वडाला फेऱ्या मारण्याची हिंमत होत असेल काय? त्याहीपेक्षा मूलभूत प्रश्न हा आहे की, फुलेंच्या काळात वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाला फेऱ्या मारण्याची प्रथा अस्तित्वात तरी होती काय?

ज्या फुले दांपत्याने आपली उक्ती आणि कृतीद्वारे पुण्यासारख्या ब्राम्हणी केंद्रात ब्राम्हणवादाच्या छाताडावर लाथा घालून पुरोगामी चळवळीचा झेंडा गाडला, त्याच फुले दाम्पत्याच्या वाड्यातील वडाला या मेधाबाईने फेऱ्या घातल्या आणि आपल्या या ब्राम्हणी कृत्याद्वारे फुले दाम्पत्याच्या सर्वंकष कर्तुत्वाला वाकुल्या दाखवण्याचा कृतघ्नपणा केला. काय म्हणावे या बेशरमपणाला..?

ज्याकाळात ब्राम्हण त्यांच्या स्त्रियांना शिकवत नव्हते, जरठबालिका विवाह प्रथेच्या माध्यमातून आठ – दहा वर्षांच्या ब्राम्हण मुलींचे लग्न पन्नास – साठ वर्षांच्या म्हाताऱ्यांशी लावून देत होते, विधवा झाल्यावर केशवपन प्रथेच्या नावाखाली त्यांचे टक्कल करत होते, त्यांचा पुनर्विवाह करण्याचा अधिकार नाकारत होते आणि त्यांना नरकयातना देत होते; अशा त्या अंधारयुगात कोणताही मायचा लाल भट त्या ब्राम्हण स्त्रियांच्या मुक्तीसाठी उभा राहिला नाही, मग कोण उभे राहिले? त्या नरकयातनेच्या काळात फुले दाम्पत्य त्या ब्राम्हण मुलींच्या मुक्तीसाठी उभे राहिले.

फुले दांपत्याने ब्राम्हण मुलींच्या शिक्षणासाठी शाळा सुरू केल्या, जरठबालिका विवाहाला विरोध केला, केशवपन प्रथेविरोधात न्हाव्यांचा संप घडवून आणला, विधवाविवाहास प्रोत्साहन दिले. ब्राम्हण पुरुषांद्वारे गरोदर राहिलेल्या ब्राम्हण विधवांसाठी बाळंतगृह सुरू केले, स्त्रियांना मानसिक व शारीरिक गुलाम बनवणाऱ्या समस्त प्रथा – परंपरांना कडवट विरोध केला.

फुले दाम्पत्याच्या या सर्वंकष त्यागामुळेच आज ब्राम्हण स्रीया जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहेत, ही मेधाबाईही आज जी खासदार आहे ना, तोही फुले – आंबेडकरांच्या त्यागाचाच परिणाम आहे; पण या मेधाबाईसोबतच तमाम ब्राम्हण आणि बहुजन स्त्रिया आपल्या उपकारकर्त्याला विसरल्या आहेत. ज्या पुरुषसत्ताक प्रथा – परंपरांतून त्यांची सोडवणूक करण्यासाठी फुले दांपत्याने आपले आयुष्य समर्पित केले, त्याच प्रथा – परंपरा मोठ्या अभिमानाने डोक्यावर घेऊन मिरवण्यात या महिला अभिमान बाळगत आहेत. विशेष म्हणजे या महिलांना शिक्षण मिळावं म्हणून फुले दांपत्याने आपले आयुष्य वेचले, तेच शिक्षण घेतलेल्या स्त्रिया फुलांचे विचार पायदळी तुडवण्यात अग्रेसर आहेत. मेधाबाई कुलकर्णी हे याचे ज्वलंत प्रातिनिधिक उदाहरण आहे.

भिडे वाड्यात फुले दांपत्याने मुलींची पहिली शाळा सुरू केली. त्याच भिडे वाड्यातील शाळेकडे पाठ करून दगडूशेठ हलवाई गणपतीपुढे अथर्वशीर्ष म्हणणाऱ्या बायांनो.. तुम्हाला अज्ञानाच्या अंधकारातून बाहेर काढण्यासाठी त्या गणपतीने काय केले ते सांगा. कोणत्या सरस्वतीने तुमच्या शिक्षणासाठी खस्ता खाल्ल्या याचे उत्तर द्या.

आणि आता या तथाकथित सुशिक्षित बायांची मजल फुले दाम्पत्याच्या वाड्यात जाऊन वटपौर्णिमेसारखा स्त्रियांच्या गुलामीचे प्रतीक असलेला सण साजरा करण्याचा आगाऊपणा करण्यापर्यंत गेली आहे आणि त्यांचं नेतृत्व कोण करत आहे, तर मेधाबाई कुलकर्णी..! विशेष म्हणजे या बाईने हा आगाऊपणा गुपचुप न करता त्याचे शूटिंग करून ते मीडियाच्या माध्यमातून सर्वत्र प्रसारित केले आणि त्याचे जाणीवपूर्वक मार्केटिंग केले. ज्या थाळीत खाल्ले, त्याच थाळीला छेद करण्याचा हा प्रकार आहे.

या बाईला वडाला फेऱ्या मारायच्याच होत्या, तर पुण्यात इतरत्र काय वडाच्या झाडांची कमतरता होती काय? सदाशिवपेठ नाहीतर शनिवार वाड्यात एखादे वडाचे झाड शोधायचे आणि त्याला दिवसभर फेऱ्या घालत बसायचे ना .. कोणी अडवले होते? पण त्यामुळे बहुजनांच्या जखमेवर मीठ चोळता आले नसते ना..! त्यासाठीच तर हा सगळा अट्टाहास आहे..!

विशेष म्हणजे ही बाई जेव्हा हा उपद्व्याप करत होती, तेव्हा पोलिस प्रशासन तिच्या संरक्षणासाठी तिथे तैनात होते. मागील वर्षी काही महिलांनी येथेच वडाला फेऱ्या मारण्याचा प्रकार केला, तेव्हा एका पुरोगाम्याने याला विरोध केला होता व त्याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकला होता. तसा धोका लक्षात घेऊन पोलिस दल तिथे तैनात करण्यात आले होते.

काय दिवस आले आहे या पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात..! ज्या विकृत प्रथा – परंपरांचे उच्चाटन करण्यासाठी शासनाने प्रयत्न करायला हवेत, त्या प्रथा – परंपरा टिकून राहाव्यात यासाठी शासन आणि प्रशासन काम करत आहे. यापेक्षा वाईट दिवस आणखी कोणते बघायला मिळतील?

थोडक्यात, पुरोगाम्यांनी आता वेळीच सावध होणे गरजेचे आहे, कारण फुले दांपत्यासारख्या आपल्या आद्य पुरोगाम्यांच्या स्मारकावरच ब्राम्हणी व्यवस्था कब्जा मिळवू पाहत आहे. आपण असेच बेसावध राहिलो, तर त्यांचा हा अंतस्थ हेतू सफल झाल्याशिवाय राहणार नाही. त्याबरोबरच पुढील वर्षी असा अनर्थ फुले वाड्यात घडणार नाही याचीही दक्षता फुले दांपत्याचे अनुयायी म्हणून आपण घेणे अत्यंत आवश्यक आहे.

मेधाबाईच्या या कृतघ्न कृतीचा जाहीर निषेध..

✍🏼 बाळासाहेब गरुड (BG)

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button