मंडलनामा क्रमशः25.तीन हजार बैठका, मेळावे

मंडलनामा क्रमशः25.तीन हजार बैठका, मेळावे
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार यांनी महाराष्ट्रात मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा शासन निर्णय (जीआर) ७ डिसेंबर १९९४ रोजी निघाला. यानंतर संघटनेचे कार्य राज्यात मोठ्या प्रमाणात सुरू झाले. ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनमध्ये विलास सोनवणे सामील झाले होते. मी व विलास सोनवणे यांनी १९९७ पर्यंत अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. या चार वर्षांच्या काळात आम्ही दोघे महाराष्ट्रातील प्रत्येक गाव, शहर, खेडे, वाडी, वस्त्या, मोहल्ल्यांत पोहोचलो. तेथे जाऊन मुस्लिम ओबीसींचा शोध घेतला व त्यांना मंडल आयोगाचा लाभ घेण्यास तयार केले. अर्धशिक्षित व अशिक्षितांना मंडल आयोगाचे लाभ समजावून सांगितले. या प्रवासात आम्हाला अनेक लहान मोठे जात समूह भेटले. मी मुसलमान असूनही जी नावे कधीच ऐकली नव्हती अशा ओबीसींचा व्यवसाय करणारे मुसलमानांतील समूह सापडले. विशेषतः भटके विमुक्तांमध्ये जाण्यात संघटनेला यश मिळाले. विलास सोनवणे यांचा इस्लाम धर्माचा अभ्यास पक्का असल्यामुळे संघटनेला या चार वर्षांत विरोधकांना भूमिका पटवून देण्यात यश मिळाले.
मुस्लिम धर्मातील कट्टरवाद्यांचा मला विरोध होता. अनेक ठिकाणी आम्हाला अडवून उभे आडवे प्रश्न विचारले जात. धर्माच्या आडून अडवणूक केली जाई. प्रश्न विचारण्यासाठी अनेकांना काही तरी अर्धवट सांगून आमच्यावर सोडले जाई. काही जणांना धर्माची माहितीच एवढी कमी होती की, त्या अर्धवट माहितीच्या आधारे ते आम्हाला अडवत असत. या सगळ्यांशी खूप समजूतदारपणे चर्चा करावी लागे. संघटनेचा उद्देश धर्मविरोधी नव्हता तर योग्य व्यक्तीस सामाजिक न्यायाचा हक्क मिळवून देण्याचा होता. येथे चर्चा करताना विलास सोनवणे पुढाकार घेत व त्यांना इस्लाम धर्म समजावून सांगत. त्यांच्या दृष्टीने मी धर्मविरोधी होतो. ते माझ्यावर विश्वास ठेवत नव्हते. पण परधमांतील व्यक्ती इस्लामची माहिती एवढ्या छान पद्धतीने देत असल्याने विलास सोनवणे यांचे म्हणणे त्यांना पटत असे.
या चार वर्षांच्या काळात अकोल्यात माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तेथे विलास सोनवणे सुद्धा होते. आम्ही काही कार्यकर्ते कुरेशी समाजाच्या वस्तीत जाऊन त्यांना मुस्लिम ओबीसी व प्रमाणपत्र कसे काढायचे याची माहिती देत होतो. तेथे गटागटाने माहिती देत असताना, ‘आम्हाला नीच जातींसोबत नेऊन बसवतो का’, अशी विचारणा करत एक जण सुरा घेऊन धावत आला. तो हल्ला करणार तेवढ्यात काही जणांनी पकडले. तो खूप संतापात होता. ‘सवलती घेऊन आम्ही दलितांमध्ये सामील व्हायचे का, आम्हाला त्यांच्या बरोबरीचे समजता का?’, असा त्याचा सवाल होता. त्याने दलित समाजाबद्दल अपशब्द वापरला. या घटनेमुळे तणाव निर्माण झाला व मदत करणारे स्थानिक कार्यकर्ते येथून निघून जाऊ, असे म्हणू लागले. पण विलास सोनवणे यांनी त्या सुरा घेऊन धावून आलेल्या माणसाला इस्लाम धर्माचे तत्त्वज्ञान असे काही सांगितले की, त्याचा विरोध मावळला. सोनवणेंचा युक्तिवाद अत्यंत बिनतोड असे.
एकदा मुंबईतील वांद्रे येथे मुस्लिम ओबीसींच्या संदर्भात एक बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीला प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते व अभ्यासक असगर अली इंजिनीअर उपस्थित होते. ‘मुस्लिमांनी आधुनिक व्हावे, जुनाट विचार सोडावेत, काळानुसार बदलावे, असे मी खूप लिहिले. भाषणे दिली. त्यामुळे फार फरक पडला नाही. पण शब्बीर अन्सारी व त्यांची संघटना घरोघरी गेली. लाखो लोकांना भेटले, त्यामुळे हा बदल होताना दिसत आहे’, असे ते म्हणाले. इंजिनीअर यांचे हे मत माझ्यासाठी कायमस्वरुपी अभिमानास्पद आहे. आम्ही मुस्लिम ओबीसींच्या लढाईत धार्मिक काम करणाऱ्या अनेकांना भेटलो. ते आमच्या विरोधात फतवे काढायचे. ओबीसीच्या नावे मुसलमानात नसलेल्या जाती निर्माण करत आहेत, असे सांगून सर्वसामान्य मुसलमानाचा गैरसमज करून देत असत. त्यांच्यामुळे अनेक ठिकाणी लोक आमच्यावर
भडकायचे. त्या लोकांशी बोलून उपयोग नव्हता. त्यामुळे आम्ही फतवे काढणाऱ्यांना भेटायचो. त्यांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करायचो. पण ते ऐकायचे नाहीत. त्यांच्या डोक्यात ‘उच्च-नीच’ असेच होते. मुळात मुसलमानातील धार्मिक कार्य करणारे व धर्मावर आधारित संघटनांचा भारतीय संविधानाचा अभ्यास नाही. त्यांना तो करायचाही नाही. ही त्यांची मुख्य अडचण आहे. त्यांचा संविधानाचा अभ्यास असता तर त्यांनी आमची अडवणूक कधीच केली नसती.
अत्यंत लहान लहान गावांतून विरोध करणाऱ्याची भूमिका नंतर बदलली. त्यांना आमची भूमिका पटली किंवा त्यांनी संविधानाचा अभ्यास केलेला नाही. कालांतराने त्यांच्या घरातील किंवा आजूबाजूच्या मुलांना ओबीसी प्रमाणपत्रांची गरज लागली. तरुण पिढी प्रमाणपत्र काढू लागली. त्यामुळे अनेकांची प्रगती झाली. अनेकांनी उच्चशिक्षण घेतले. त्यांच्या घरातील तरुण पिढीला मान सन्मान मिळत असल्यामुळे त्यांचा विरोध कमी झाला आहे. या धर्मवाद्यांना आमच्या चळवळीमुळे फरक पडला नाही तर मंडल आयोगाचे लाभार्थी झाल्यामुळे विरोध मावळला आहे.
लखनौमध्ये परिषद आयोजित केली असताना आम्ही उत्तर प्रदेशात दौरे करत होतो. तेव्हा काही जणांनी माझी मौलाना अली मियाँ नदवी यांच्याकडे जाऊन तक्रार केली. त्यांना मुस्लिमधर्मीय मोठा मान देतात. महाराष्ट्रातून कोणी शब्बीर अन्सारी आला असून तो मुसलमानात जाती असल्याचे सांगत फिरत आहे, असे त्यांना सांगितले होते. मौलाना नदवी यांनी मला बोलावले व हे काय चालले आहे?, अशी विचारणा केली. मी त्यांना सर्व माहिती दिली. उत्तर प्रदेशात सलमानींसोबत (हजाम) आपल्याच मुसलमानांचा कसा व्यवहार आहे?, अशी विचारणा केली. त्यांचा धर्माचा अभ्यास होता. त्यासोबतच धार्मिक पुस्तकांतील ज्ञान व वस्तुस्थिती याची सांगड घालण्याचे भानही होते. त्यांना माझे मुद्दे पटले. त्यांनी मला आशीर्वाद दिला.
नवी दिल्लीत एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या निमित्ताने देशातील सर्वात मोठ्या मुस्लिम जमातच्या अखिल भारतीय सचिवांना मी भेटावे, असा आग्रह विलास सोनवणे यांनी केला. मला त्या सगळ्यांचा पूर्वानुभव असल्याने मी गेलो नाही. विलास सोनवणे यांनी त्यांची भेट घेऊन कार्यक्रमाची माहिती दिली. सहाजिकच माझे नावही सांगितले. त्यावर ते अखिल भारतीय सचिव एकदम उसळून म्हणाले, ‘ओ दर्जी हमें सिखाऐगा?’ विलास सोनवणे यांनी इस्लाम धर्मातील दाखले देत तुमच्या सारखा महनीय व्यक्ती एखाद्याचा ‘दर्जी’ असा उल्लेख कसा करू शकता?, असा रोकडा सवाल केला. त्या दोघांत धर्मावर गहन चर्चा झाली व सोनवणे यांनी त्यांना निरुत्तर केले. आता चळवळ स्वीकारली गेली असल्याने मला त्यांचे नाव येथे लिहायचे नाही. काळाच्या रेट्यात धार्मिक संघटनांतील अनेकांच्या भूमिका बदलल्या आहेत. त्यामुळे भूतकाळात त्यांनी घेतलेल्या काही भूमिकांवरून वर्तमानकाळात त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे योग्य ठरणार नाही. या चार वर्षांत सुमारे तीन हजार बैठका, मेळावे, भेटीगाठींचा वेग खूप होता. चार वर्षांतील दिवसांचा हिशोब केला तर मी, विलास सोनवणे व संघटनेच्या कार्यकर्त्यांनी किती झपाटून काम केले असेल ते लक्षात येईल.
🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴




